Blog

रायगड लोकधारा वृत्त :

महाड प्रतिनिधी : १० जानेवारी २०२६ / ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड (बिर्ला पेंट्स विभाग) महाड यांच्या कॉर्पोरेट पर्यावरण जबाबदारी (CER) उपक्रमांतर्गत, सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदिपुरकर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल यांच्या सहकार्याने, मौजे काम्बळे तर्फे बिरवाडी, तालुका महाड येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात डोळ्यांची अचूक तपासणी, चष्म्याचा नंबर काढून मोफत चष्म्यांचे वाटप, डोळ्यांतील पडद्याची तपासणी, काचबिंदू तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना त्याच दिवशी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. रुग्णांना नेणे-आणणे तसेच एक दिवस राहण्याची सोयही ग्रासिम कंपनीमार्फत करण्यात आली.

या शिबिरात काम्बळे तर्फे बिरवाडी, भोगाव, शेल, नांगलवाडी, महाड, टेमघर तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण ४७५ नागरिकांनी सहभाग घेतला, त्यापैकी ७२ रुग्णांमध्ये मोतीबिंदू, तर १९६ रुग्णांना चष्म्याची गरज असल्याचे निदान झाले. तसेच १०० रुग्णांना नियमित तपासणीसाठी पोलादपूर केंद्राला भेट देण्याची सूचना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपविभागीय अधिकारी श्री. पोपट ओमासे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जीवन माने, ग्रासिम कंपनीचे अधिकारी श्री. अरुण शिर्के, श्री. महेंद्रसिंह शेखावत, श्री. राजकुमार लाखोटिया, श्री. सचिन यल्लुरकर, श्री. राहुल बारटक्के, श्री. दीपक बुट्टे, श्री. आमीर चव्हाण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच काम्बळे तर्फे बिरवाडी गावचे सरपंच श्री. सुनीलभाऊ देशमुख, भोगाव व शेल गावचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.