रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आधार सामाजिक संस्था ( अलिबाग ), सुदर्शन सुधा CSR यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तसेच स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश देणारी नाटिका सादर करण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक सहभाग याबाबत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन करणे साठी श्री. किशोर काळोखे सर, ग्रामपंचायतीतील सरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, आधार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सुदर्शन CSR चे संजय कचरे सर, दिशांत धाने सर, सर्व स्वयंसहाय्यता महिला समूहांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. संचित सर, प्रभाग समन्वयक श्रीम. दर्शना श्रीवर्धनकर, श्रीम. मनाली शिगवण यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित महिलांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून समाजात समानतेचा संदेश अधिक दृढ झाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
