रायगड लोकधारा वृत्त :
संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणारी धारातीर्थ यात्रा यंदा किल्ले रायगडावर येणार असून ७ फेब्रुवारीला पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ उमरठ येथून सुरू होणार आहे.
महाड : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेकडून (Shiv Pratishthan Hindustan Sanghatana) पोलादपूर तालुक्यातील उमरठ ते रायगड किल्ला (Raigad Fort) अशी पायी धारातीर्थ यात्रा ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी, अपघात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ९ फेब्रुवारीला सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत कातिवडे-ढालकाठी तसेच महाड एमआयडीसीमधील खरवली, बिरवाडी, आसनपोई, नांगलवाडी, नडगाव मार्गावरील जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. आजच्या तरुणांमध्ये छत्रपती शिवरायांसारखे शौर्य व वीरत्वाचे गुण निर्माण व्हावे, या उद्देशाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेकडून दरवर्षी गड-किल्ल्यांची पायी धारातीर्थ यात्रा आयोजित केली जाते.
संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणारी धारातीर्थ यात्रा यंदा किल्ले रायगडावर येणार असून ७ फेब्रुवारीला पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ उमरठ येथून सुरू होणार आहे. या मार्गादरम्यान यात्रा महाड तालुक्यातून कातिवडे, ढालकाठी-खरवली, बिरवाडी असे पायी मार्गक्रमण करीत ९ फेब्रुवारीला महाड एमआयडीसीतील आसनपोईमार्गे पुढे जाणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या धारातीर्थ यात्रेच्या व्यवस्थापनासाठी सर्व प्रशासकीय विभाग सज्ज असल्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
यात्रा सुखकर होणार
रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीदेखील रायगडात ही यात्रा शांततेत पार पडेल, अशी ग्वाही बैठकीदरम्यान दिली आहे. आपल्या मतदारसंघात येत असणारी ही यात्रा सुखकर होण्यासाठी प्रवासात कोणतीही अडचण भासणार नाही, अशा पद्धतीचे प्रशासकीय नियोजन करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित केल्याचे गोगावले यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंसाठी वाहतूक सुरू राहणार
दूध, डिझेल, गॅस, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. या आदेशान्वये महाड एमआयडीसी पोलिस ठाणे दक्ष झाले असून धारातीर्थ यात्रेसंबंधी मार्गावरील वाहतूक व्यवस्था व अन्य काही समस्या असल्यास एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य व्यवस्थेचे नियोजन
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी, शिवप्रतिष्ठानचे यात्रेकरू हे अन्नशिधा हा स्वतःच घेऊन येत असल्यामुळे त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार नाही. प्रवासादरम्यान त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

