रायगड लोकधारा वृत्त :
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहर व पंचक्रोशीमध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांत वाढ झाली आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदी शहराच्या हवेली भागातील इंद्रायणी नगर परिसरामध्ये एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत मुलावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि.४) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गौरव माळी व संस्था चालक महेश नरोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार जानेवारी महिन्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगा हा इंद्रायणीनगर येथे खासगी वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यावर रियाज करून तो इतर मुलांप्रमाणे संस्थेच्या हॉलमध्ये झोपला होता. रात्री बाराच्या सुमारास आरोपी गौरव माळी याने त्याच्याजवळ येत लैंगिक अत्याचार केले. पुढे तीन ते चार दिवस असच घडत राहिले. पीडित मुलाने याला विरोध करण्याचा प्रयत्न करत याबाबत संस्थाचालक महेश नरोडे महाराज यांना माहिती दिली त्यांनी माळीवर कारवाई न करता.प्रकार लपवत उलट कोणासही व घरच्यांनाही सांगायचा नाही अशी धमकी दिल्याचे pidit मुलाने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलाच्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आळंदी पुन्हा एकदा अशा घृणास्पद प्रकाराने हादरली असून वारंवार असे प्रकार घडल्यानंतर देखील यावर कायमस्वरूपी वचक आणण्यात प्रशासन कमी पडले असून केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या नादात अल्पवयीन मुलांचे शोषण मात्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आळंदी शहर व पंचक्रोशीमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या आळंदीकरांच्या रोशाला प्रशासन सामोरे गेले होते; मात्र कागदी घोडे नाचवण्याच्या पुढे प्रशासनाने काहीच न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुन्हा आळंदी शहरात होणाऱ्या बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त होत आहे. महिला आयोगाने यात लक्ष घालत नुकतेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या आळंदीत येऊन गेल्या होत्या. त्यांनी ४८ तासात बेकायदेशीर संस्थांवर कारवाई करू असा आदेश दिले होते; मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला असून यामुळे आळंदीकर संताप व्यक्त करत घर. प्रशासन नक्की करते काय असा थेट सवाल आळंदीकर उपस्थित करत आहेत.
