रायगड लोकधारा वृत्तसेवा :
महिलांच्या स्वावलंबनासाठी मी कटिबद्ध-सुजाता पाटील…




रायगड लोकधारा प्रतिनिधी / उलवे : महिलांना रोजगार मिळावा, यासाठी मी नवी मुंबई परिवहन सेवेत प्राधान्य देणार आहे. महिला स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे कार्य चांगले आहे. गरिबांचा विचार करून सुरू असलेले संस्थेचे शैक्षणिक कार्य महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रांतील महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर पुरस्काराच्या रूपाने मारलेली थाप कौतुकास्पद आहे, असे नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील म्हणाल्या, राजकारणात त्यांनी गृहिणी, नगरसेवक, समाजकल्याण सभापती ते महापौर अशी घवघवीत कामगिरी केली आहे. तसेच त्या उच्चशिक्षित आहेत. त्याबद्दल त्यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा समाजाशी निगडित क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांनाही यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे यमुना स्त्री सन्मान पुरस्कार दिला गेला. हा समारंभ बुधवारी (ता. ११ मार्च) उलवे नोड येथे शेलघर वेथील ‘सुखकर्ता’ बंगल्याच्या गार्डनवर दिमाखात पार पडला. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला. त्यात नवी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील, पनवेलच्या उपमहापौर प्रमिला पाटील, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गलांडे, माया जाधव (लावणी सम्राज्ञी), मीनल भामरे (तहसीलदार, पनवेल), अड. श्रद्धा ठाकूर (बकील), अपर्णा पवार (वैद्यकीय अधिकारी), सुप्रिया घरत (संगीत विशारद), रिदिमा म्हात्रे (बॅडमिंटनपटू), जान्हवी सावंत यांचा समावेश होता. या सर्व महिलांचा स्मृतिचिन्ह, पैठणी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, महेंद्रशेठ घरत आई-वडिलांचा आणि माझाही वारसा चालवत आहे. आमच्या संबंधात राजकारण आडवे येत नाही. तो सतत धडपडत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने नाव कमावले आहे, हे अभिमानास्पद आहे. यावेळी ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी माया जाधव म्हणाल्या, पहिल्यांदा मी शिक्षण घेतले, त्यानंतरच नृत्याकडे वळली. लावणीच्या कार्यक्रमांना महिला येत नव्हत्या, तेव्हा मी खास महिलांसाठी प्रयोग केले, ते हाऊसफुल्ल झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे युवा अध्यक्ष शिबराज मोरे, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, तसेच सिनेअभिनेत्री सायली संजीव उपस्थित होत्या. संस्थेच्या सचिव शुभांगीताई घरत यांच्या हस्ते मान्यवर महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, माझे आई-वडील कष्टाळू होते. आईने गरिबीशी सामना करताना आम्हा भावंडांना शिकविले, मोठे केले. आई-वडिलांची नाळ समाजाशी जोडलेली होती. सामाजिक बांधिलकी त्यांनी कायम जपली. त्यामुळे
त्यांचा वारसा जपण्यासाठीच मी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. त्याचाच भाग म्हणून आई-वडिलांच्या नावाने शैक्षणिक काम सुरू केले. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेद्वारे गरिबांच्या मुलांना अत्यल्प फीद्वारे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे, तर बडिलांच्या नावाने ज्युनियर महाविद्यालय सुरू आहे. आईच्या निधनानंतर यमुना स्त्री सन्मान पुरस्कार समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून समाजातील लढणाऱ्या महिलांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मिळेल. अन्नदान आणि गरजूंना मदत हेच कार्य पुढील काळातही सुरू राहील. यावेळी उद्योजक सोनाली घरत, कुणाल घरत, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, राम म्हात्रे, ढाणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
