रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे :- ‘जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे’, आणि ज्या समूहाच दुःख त्याच समूहाला कळतं व त्याची जाणीव ही त्यांनाच होते. आणि तोच समूह मदतीला धावून येतं. हेच सिद्ध होतं. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांची एकजूट याच एकजुटीमुळे या तालुक्यातील जसखार गावामधील प्रशांत नारायण पारवे हे एक अस्थिव्यंग दिव्यांग आहेत. त्यांची २४ मार्च ला अचानकपणे तब्येत बिघडली. त्यामुळे सुरुवातीला त्यांना द्रोनागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे चांगल्या प्रकारे व्यवस्था नसल्याने त्यांना कळंबोली येथील एम.जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या सहकार्याला आपण काहीतरी मदत करायला हवी. या हेतूने दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सर्व सदस्यांनी एकमताने पुढाकार घेऊन संपूर्ण उरण तालुक्यातील दिव्यांगाना मदतीचे आव्हान केले. मुळातच प्रत्येक दिव्यांग आपले खडतर आयुष्य जगत आहेत. तरीही आपल्या या खडतर आयुष्यातून सहकार्याची भावना दाखवून तालुक्यातील जवळजवळ ४१ दिव्यांग बांधवांनी आपल्याला जमेल तेव्हढी मदत करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी दिव्यांग दिव्यांगाच्या मदतीला धावून आले. या मदतीच्या हाकेतून ३५,३०० रुपये एवढी रक्कम जमा झाली. सामान्य माणसांसाठी सदर रक्कम खूप छोटी असेल पण दिव्यांगाने आपल्या खडतर आयुष्यातून आपल्याच सहकार्याला केलेली ही मदत खूप लाख मोलाची आहे. सदर रक्कम दिव्यांग प्रतिनिधींनी प्रशांत नारायण पारवे यांच्या पत्नी अर्चना प्रशांत पारवे यांच्या कडे २ एप्रिल २०२५ रोजी सुपूर्त करण्यात आली. त्यांच्या पत्नी मदत घेण्यास नकार देत होत्या परंतु दिव्यांग बांधवांनी आपला सहकारी लवकर बरा व्हावा आणि त्याच्या रुग्णालयातील खर्चात आपलाही खारीचा वाटा असावा असे मत व्यक्त केले. आपला दादा लवकर व्यवस्थित होऊन पुन्हा आमच्यासोबत यावा हीच अपेक्षा सर्व दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. प्रशांत पारवे यांच्या पत्नीने सर्व दिव्यांग बांधवांचे आभार व्यक्त केले. दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या मदतीच्या हाकेला उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव एकत्र आले यासाठी सदर संघटनेच्या सर्व सदस्यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे आभार व्यक्त केले.
