रायगड लोकधारा वृत्त :
तलाठ्याला महाड क्रांतिस्तंभ येथून तर मंडळ अधिकाऱ्याला बिरवाडीतून घेतले ताब्यात…
रायगड- नितेश लोखंडे : मागील काही दिवसापूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाठी व मंडळाधिकारी यांना तीन हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सदरची घटना शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महाड येथे घडली आहे. लाचखोर तलाठी सुरज मोहनलाल पुरोहित, राहणार:- एप्पल प्लाझा- नवेनगर महाड व लाचखोर मंडळ अधिकारी भगवान तेजराव मोरे राहणार बिरवाडी – महाड अशी दोघा लाचखोर लोकसेवकांची नावे असून अँटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली आहे. सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीने वरंडोली – महाड येथे काही क्षेत्र खरेदी केले होते. नमूद मालमत्तेच्या सातबारा उतारा नोंदीवर तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव नोंद करून देण्याकरिता वरंडोली गावचे तलाठी सुरज पुरोहित व मंडळ अधिकारी भगवान मोरे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली असता याबाबत तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाड क्रांतीस्तंभ येथे सापळा रचून तलाठी सुरज पुरोहित याला रंगीहात पकडले तर मंडळ अधिकारी भगवान मोरे यांना बिरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले. अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस अधिक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो रायगड जिल्हा उप अधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस हवलदार सचिन आटपाडकर, पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या टीमने सापळा रचून लाचखोर तलाठी व मंडळ अधिकारी यांना रंगीहात पकडून महत्त्वाची कामगिरी केली.

