रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. ४ ( विठ्ठल ममताबादे ) : ठाणे जिल्ह्यातील शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे कट्टर, एकनिष्ठ, प्रामाणिक पदाधिकारी, ठाणे जिल्हाध्यक्ष वैशालीताई लाठे (वय ४५ ) यांचे रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वैशालीताई लाठे या २०१३ पासून शिवा संघटना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर वीरशैव लिंगायत व बहुजन समाजातील महिलांना संघटित करण्यासाठीच तसेच राज्यभरामध्ये समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक आंदोलनात आणि सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी असायच्या. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचे अगदी विश्वासू पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येकाच्या सुख दुःखात दिसणारे, प्रत्येक आंदोलन, संपात सहभागी असणाऱ्या वैशालीताई लाठे यांनी आज रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजता राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे असे अचानक जाण्याने ठाणे जिल्ह्यातील शिवा संघटना व वीरशैव लिंगायत समाजामध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. कैलासवासी वैशालीताई लाठे यांना शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनेही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या दुःखातून सावरण्यासाठी लाठे परिवाराला बळ द्यावे अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना शिवा संघटना परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. वैशालीताई लाठे यांनी आत्तापर्यंत केलेले कार्य सदैव आमच्या आठवणीत राहील इतिहास घडवणारे रणरागिणी आज आमच्यातून गेल्या अशा भावना व्यक्त करत असताना प्रत्येकाला यावेळी अश्रू अनावर झाले. वैशाली लाठे यांच्या पश्चात पती सुनील लाठे व मुलगी गौरी लाठे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. वैशाली लाठे यांच्या निधनाने लाठे परिवार, शिवा संघटना, वीरशैव लिंगायत समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

