रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी : ‘निष्ठावंत, कट्टर कार्यकर्ता, एक पक्ष-एक झेंडा’ अशी वाड-वडिलांपासून ओळख असणारा एखाद्या पक्षाचा शिलेदार असा विषय येतो, तेव्हा मला रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नारायणशेठ भोपी यांचे ज्येष्ठ पूत्र शेतकरी कामगार पक्षाचे शिरढोण गावातील कार्यकर्ते संग्राम नारायणशेठ भोपी यांची सर्वात पहिल्यांदा आठवण येते. आता शेकापमध्ये पक्षांतराचे वारे सुरू आहेत. पक्षाने अनेकदा डावळूनही संग्रामशेठ हे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील आणि शेकापच्या लाल बावट्यासोबत आजही खंबीरपणे उभे आहेत. अशाच निष्ठावंतांच्या मेहनतीने शेकाप पुन्हा उभारी घेईल, असे वाटते.
पनवेल तालुक्यातील शिरढोण गावामध्ये राहणारे संग्राम भोपी यांची आज तिसरी पीढी शेकापचे काम करीत आहे. वडिल नारायणशेठ भोपी हे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. तर, आजाेबा बाळू भोपी यांनी शिरढोण गावचे सरपंचपदही सांभाळले. तसेच काका बबन भोपी हे ग्रामपंचायत सदस्य होते. संग्राम भोपी यांचे वडिल नारायणशेठ भोपी हे आमदार विवेक पाटील यांचे जुने सहकारी. दोघांनी एकाचवेळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
शिरढोण परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्ष वाढवण्यामध्ये भोपी कुटुंबियांचे मोठे योगदान राहिले आहे. वडिल स्व. नारायणशेठ भोपी यांच्या अकाली निधनानंतर संग्राम यांनी पूर्ण कुटुंबाचा आधार बनून वडिलांचा व्यवसाय तितक्याच तळमळीने सुरू ठेवला. अनेक आव्हानांवर मात करीत आज शिरढोणजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील ‘हॉटेल संग्राम’ खवय्यांची गर्दी खेचत आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिललेले वडिल नारायणशेठ भोपी यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्या मुलाला साधे ग्रामपंचायत तिकिटही दिले नाही. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले असता तिथेही डावळले गेले. अनेकदा अपमान होऊनही संग्राम भोपी शेकापशी एकनिष्ठ राहिले. विरोधक त्यांच्याकडे घेण्यास अनुकूल असूनही पक्ष बदलण्याचा विचारही संग्राम भोपी यांच्या मनाला शिवला नाही.
जुन्या कार्यकर्त्यांना जवळ करा !
_‘संग्राम’ हा एक उदाहरण आहे. पनवेल-उरणमधील गावागावांत शेकापक्षाशी एकनिष्ठ असलेले ‘संग्राम’ सारखे अनेक कार्यकर्ते पक्षाचे इमाने-इतबारे काम करीत आहेत. पक्षाने अशा उपेक्षित कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिले. पक्षवाढीसाठी अनेक वर्षे झटलेल्या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना जवळ करावे लागेल. आज शेकापची झालेली अवस्था पाहून पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत काही बदल घडवावेत, असे राजकीय अभ्यासक म्हणून वाटते.
