रायगड लोकधारा वृत्त : दिनांक : ११ मे २०२५
उलवे प्रतिनिधी : विवाह सोहळे शाही थाटात होतात. याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय कामगार नेते यांनी आणून दिला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचा सोनालीचा विवाह सोहळा राजस्थानमधील ‘उमेद भवन’ या महालात चार वर्षांपूर्वी शाही पद्धतीने केला होता. जिथे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे विवाह होतात, तिथे आगरी समाजातील पहिली व्यक्ती म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या लेकीचा दिमाखात विवाह सोहळा साजरा करून दाखवला होता. तसेच मुलगा कुणाल याचाही दृष्टलागण्याजोगा विवाह सोहळा रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे केला.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा पुतण्या हार्दिक अनिल घरत याचा विवाह घणसोली येथे श्रेया राजेश पाटील यांच्याशी गुरुवारी (ता. ९) शाही थाटात झाला. नवी मुंबईतील माजी नगरसेवक दिवंगत दिपक दगडू पाटील यांची श्रेया ही पुतणी, तर राजेश पाटील यांची कन्या होय. हार्दिकचे वडील अनिल घरत हे व्यावसायिक, घरत-पाटील परिवार नवी मुंबईत नावाजलेले आहे. त्यामुळे विवाह सोहळा चार चाँद लागावे असा होता. या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तसेच नवी मुंबईतील आजी-माजी महापौर, बहुसंख्य नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्याची चर्चा नवी मुंबई परिसरात होत आहे.




