रायगड लोकधारा वृत्तसेवा :
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका, पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कांतीलाल पाटील : पिंपरी चिंचवड, दि.२५ : पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी झाला. या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा होऊ लागल्या आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
