⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
स्थापनेच्या ३६ वर्षांचा उत्सव साजरा….
उरण दि. २६ विठ्ठल ममताबादे : भारताचे सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणारे बंदर म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सोमवारी, २६ मे २०२५ रोजी आपला ३६ वा वर्धापन दिन साजरा करताना भारतातील कंटेनर बंदर क्षेत्रात आपले स्थान “भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर” म्हणून नव्याने परिभाषित केले. या विशेष कार्यक्रमात भारत सरकारचे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यात मा. श्री. शांतनू ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग), श्री. टी. के. रामचंद्रन, भा.प्र.से., सचिव (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय), श्री श्याम जग्गनाथन, भा.प्र.से., महासंचालक (शिपिंग), श्री. विमलकुमार श्रीवास्तव, भा.रा.से., मुख्य आयुक्त (कस्टम्स, मुंबई), श्री. विजयकुमार, भा.प्र.से., अध्यक्ष (आयडब्ल्यूएआय), श्री. शशिकिरण शेट्टी, अध्यक्ष (ऑलकार्गो ग्रुप), श्री. ध्रुव कोटक, व्यवस्थापकीय संचालक (जेएम बक्षी ग्रुप), विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व जनेप प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक श्री उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.
समारंभाचा एक भाग म्हणून, उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले आणि गेल्या साडेतीन दशकांमध्ये झालेल्या जनेप प्राधिकरणाच्या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात ‘जनेप प्राधिकरण ३६ वर्षांचा प्रवास’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले, ज्यात बंदराच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आणि यशाचा आलेख मांडण्यात आला आहे. तसेच, जनेप प्राधिकरण कॉर्पोरेट फिल्मची खास स्क्रीनिंग करण्यात आली, ज्यामध्ये बंदराची पायाभूत सुविधा, नवोपक्रम, शाश्वतता विषयक प्रयत्न, आणि भविष्यकालीन दृष्टीकोन यांचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रमासाठी दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. पहिला सामंजस्य करार व्हीपीपीएल आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात झाला असून, ग्रामीण तरुण, शेतकरी आणि शेतमाल उत्पादन कंपन्यांचे कौशल्यविकास करण्यासाठी लक्ष केंद्रित प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. या सहकार्याचा उद्देश म्हणजे कृषी-लॉजिस्टिक्स मूल्यसाखळीला बळकटी देणे आणि स्थानिक समुदायांना उदयोन्मुख संधींसाठी तयार करणे.
दुसरा सामंजस्य करार व्हीपीपीएल आणि रूरल एनहॅन्सर्स प्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्यात झाला असून, वधवन पोर्टवर कंटेनर, बाळ्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी टर्मिनलच्या विकासात सहभागी होण्याचा त्यांचा उद्देश नमूद केला आहे. तसेच, समुद्री सेवा, इंटरमोडल कनेक्टिव्हिटीसाठी सहाय्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, आणि डिजिटल सोल्यूशन्स, मजबूत आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि संरचित मनुष्यबळ प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या माध्यमातून पर्यावरणीय टिकाव सुनिश्चित करणे याचा देखील यात समावेश आहे. हे भागीदारी उपक्रम वाढवण बंदराला एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख सागरी प्रवेशद्वार म्हणून घडविण्याच्या जनेप प्राधिकरणाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
भारत सरकारचे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “जनेप प्राधिकरणाच्या कुटुंबाला ३६ वर्षांच्या समर्पित सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. मा. पंतप्रधानांच्या ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या दूरदृष्टीने मार्गदर्शित होत, जनेप प्राधिकरणाने केवळ एक बंदर न राहता राष्ट्रीय विकासाचा एक शक्तिशाली घटक बनले आहे. भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून जनेप प्राधिकरणाचा उदय ही त्याच्या कार्यपद्धतीची ताकद दर्शवतो — जे नेतृत्व, नवकल्पना आणि खाजगी क्षेत्राच्या सक्रीय सहभागामुळे शक्य झाले आहे. वाढवण पोर्टसारख्या प्रकल्पांमुळे भारत जगातील शीर्ष १० समुद्री केंद्रांमध्ये स्थान मिळवू शकतो, आणि यासाठी जनेप प्राधिकरण हे आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बंदर क्षेत्राचे आदर्श उदाहरण ठरते. हा विकास जबाबदारीही वाढवतो — संपूर्ण बंदर क्षेत्रासाठी नेतृत्व करण्याची, प्रेरणा देण्याची आणि दर्जा उंचावण्याची. आता कृतीची वेळ आहे — एकता, नियोजन आणि हेतूने, भारत जगातील शीर्ष ५ समुद्री राष्ट्रांमध्ये स्थान मिळवू शकतो.
श्री. शांतनू ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग) म्हणाले, “जनेप प्राधिकरणाचा ३६ वा वर्धापन दिन ही केवळ एक साजरी घटना नाही — ती देशातील बंदर क्षेत्राबाबत वाढत्या रसाचे प्रतीक आहे आणि आपल्या आर्थिक वाटचालीतील बंदरांची महत्वाची भूमिका अधोरेखित करतो. १० दशलक्ष टीइयु क्षमतेसह, जेएनपीए मा. पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला आणि मा. मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या मार्गदर्शनाला योग्य न्याय देत आहे. ज्या देशात ७०% व्यापार बंदरांद्वारे होतो, तिथे स्पष्ट दृष्टी आणि प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. भारताचे चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर ही दूरदृष्टी आणि ठोस नेतृत्वाची फलश्रुती आहे — आणि तीच मूल्ये जेएनपीएच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीममध्ये दिसून येतात. हाच ‘विकसित भारत’चा उद्देश आहे.”
श्री. टी. के. रामचंद्रन, भा.प्र.से., सचिव (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय) कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “बंदर क्षेत्रात जेएनपीएने एक आदर्श उदाहरण म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. मा. पंतप्रधानांच्या ‘अमृत काळ’ दृष्टिकोनाशी सुसंगत पद्धतीने, जेएनपीएने क्षमता वाढ, शाश्वतता, डिजिटलायझेशन आणि बंदर-केंद्रित औद्योगीकरण या सर्व क्षेत्रांत यश संपादन केले आहे. १००% सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP)आधारित माल हाताळणी, प्रस्तावित वाढवण पोर्ट, विशेष आर्थिक क्षेत्र आणि IMEEC व दुबई डिजिटल कॉरिडॉर सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रम — हे सर्व जेएनपीए ला सुरक्षित, स्मार्ट, आधुनिक आणि शाश्वत भविष्यातील भारतीय बंदरांचे प्रतीक बनवतात.”
=कार्यक्रमात बोलताना जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक श्री उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी सांगितले की, “३६ वर्षांच्या वाटचालीनंतर, जेएनपीए एका टप्प्यावर उभं आहे — हा यशाचा थांबा नाही, तर अधिक जबाबदारीची सुरूवात आहे. भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर बनणं ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर हे शिस्तबद्ध नियोजन, विविध क्षेत्रांतील समन्वय आणि कर्मचाऱ्यांच्या शांत पण दृढ प्रयत्नांची साक्ष आहे. ही प्रगती आमच्या टीमच्या मेहनतीने, व्यापार भागीदारांच्या विश्वासाने आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने शक्य झाली आहे.
आता पुढचा टप्पा अधिक गतिमान निर्णय, व्यापक प्रणाली विचार आणि जागतिक व्यापाराच्या बदलत्या स्वरूपाशी सुसंगत राहण्याची गरज ओळखतो. आम्ही असं एक बंदर परिसंस्थेचं रचना करत आहोत, जी केवळ प्रतिसाद देणार नाही तर बदल ओळखून स्वतःला त्या अनुसार घडवेल. ही वर्धापनदिनाची संधी थोडक्यात मागे पाहण्याची आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, पुढील दीर्घ प्रवासासाठी आपली दिशा पुन्हा ठरवण्याची आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
समारंभानंतर एक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये सागरी व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील व्यावसायिक तसेच जनेप प्राधिकरणाचे कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदान आणि सेवा गुणवत्तेबद्दल गौरवण्यात आले. हे पारितोषिक त्यांच्या समर्पण आणि प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी होते, ज्यांनी जनेप प्राधिकरणाला आजच्या उंचीवर पोहोचविण्यात मदत केली.
जनेप प्राधिकरण त्यांच्या विस्तार योजनांसह आणि स्मार्ट पोर्ट उपक्रमांसह पुढे जात असताना, भारताच्या सागरी व्यापाराला अधिक बळकट करत आहे आणि जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करत आहे.




