⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन…
उरण दि. २८ विठ्ठल ममताबादे : गेली अनेक दिवस उरण तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वादळवाराही जोरात सुरु आहे. विजेचा गडगडाट त्यातही जोरात पाऊस, वादळवारा यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील ७० हुन अधिक घरांची नासधुस झाली आहे. अनेक जणांचे घराचे पत्रे, शेड उडाले आहेत. तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती पडल्या आहेत. काही घरांवर विजेच्या तारा, झाडे पडली आहेत. तर काही नागरिकांच्या घरात पावसाचे मोठया प्रमाणात पाणी शिरले आहे. अनेक नागरिकांचे घरातील टीव्ही, फ्रिज पंखे आदी उपकरणे खराब झाले आहेत.उरण तालुक्यातील ग्रामीण भागात मे महिन्यात शेतीतील अन्न धान्य, कडधान्ये घरात साठविले जातात. हेच साठविलेले अन्न धान्य वर्षभर जेवण्यासाठी वापरले जातात मात्र पहिल्याच पावसात घरातील भात, अन्न धान्य कड धान्ये सुद्धा पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे वादळवारा व जोरदार मुसळधार पाऊस मुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गावामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या जीवितेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. पूर्व विभागातील सारडे, कळंबूसरे, चिरनेर, वशेणी आदी विविध गावात नागरिकांच्या घराचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या सर्व गंभीर परिस्थिती मध्ये नुकसानग्रस्त जनता शासनाकडे मदत मागत आहे. या विषयांचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांनी या घटनेत जातीने लक्ष घालून नुकसानग्रस्त गावांमध्ये जाऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त गावांना शासनाकडून भरीव मदत मिळावी. तसेच जनजीवन सुरळीत करून लवकरात लवकर नागरिकांना, नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार महेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी उपसभापती नरेश घरत, उरण तालुका चिटणीस रवि घरत,विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील, सोशल मीडिया रायगड जिल्हा प्रमुख संदीप पाटील (दिघोडेकर ), रायगड जिल्हा कमिटी मेंबर दत्ता घरत,जिल्हा कमिटी मेंबर निलेश पाटील, जेष्ठ नेते नारायण पाटील, जेष्ठ नेते सुरेश पाटील,तालुकाध्यक्ष वैशाली पाटील, तालुका उपाध्यक्ष जयश्री ठाकूर, तालुका खजिनदार रेखा घरत, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, उरण शहर महिला अध्यक्ष नयना पाटील, प्रमिला घरत,जासईचे सरपंच संतोष घरत, दिघोडेचे युवा नेता प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत ठाकूर (डोंगरी )आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
