⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. २९ विठ्ठल ममताबादे : आगरी ग्रंथालय चळवळ आणि भुमीपुत्र फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या आगरी शाला उपक्रमात भिवंडीचे खासदार बाल्यामामा यांच्या शुभहस्ते रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांना आगरी बोलीतील ” साहित्य रत्न पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार टाऊन हॉल ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.
” साहित्य रत्न ” प्रा. एल. बी. पाटील हे उरण तालुक्याचे सुपुत्र असून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. आजपर्यंत त्यांनी १८ नाटके, ७ एकांकिका, ५ कविता संग्रह, ३ कादंबरी, २ ललित लेखन अशी ३५ पुस्तके प्रकाशित केली आहेत.त्यापैकी आगरी बोलीत चार नाटके, एक सुप्रसिद्ध “साडेबाराचा पलाट” हा कविता संग्रह, एक “आगराच्या वाटा ” हे ललित लेखनाचे पुस्तक बहुचर्चित राहिले आहे.
रायगड जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात चळवळखोर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कविता जागरातून खोपट्याच्या सात गावांना नळपाणी योजनेचे पाणी आणणे, २००५ च्या सेझ लढ्यात २३ गावांना कवितांचा जागर करणे, उरणकरांचे मैदान मिळविण्यासाठी १७ गावांना कवितांच्या जागरातून यश मिळवून देणे, उरणात १९९८ मध्ये होऊ घातलेले लेडिजबार बंद पाडून तसे बार होऊ न देणे इत्यादी उपक्रमातील नेतृत्वाच्या भूमिकेला “साहित्यरत्न पुरस्काराने” न्याय दिला आहे.
यावेळी भिवंडीचे समाज सेवक विजय दादा, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, कवी अरुण म्हात्रे, गायक जगदीश पाटील, किसन फुलोरे, अनंत भोईर, आगरी बोलीचे संवर्धनकर्ते सर्वेश तरे, सुशांत दादा, मोरेश्वर पाटील, प्रकाश पाटील, दया नाईक, सुनिल पाटील इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
