⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये’ शाळा प्रवेशोत्सव’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक 16 जून 2025 रोजी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी सर्व कार्यालयातील शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शाळेत जाऊन शाळा भेटीच्या माध्यमातून विदयार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्ता वाढ करण्यासाठी करणे या सहेतूने शाळा भेटींचे आयोजन करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने उरण तालुका पंचायत समिती मार्फत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांवर भेटी देण्यात आलंग. उरण तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री. महेश बालदी साहेब, उरणचे तहसीलदार सन्माननीय कदम साहेब, गटविकास अधिकारी सन्माननीय समीर वाठारकर साहेब, गटशिक्षणाधिकारी सन्माननीय सौ. निर्मला घरत मॅडम, उरण पोलिस ठाणे चे वरीष्ट पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री मिसाळ साहेब तसेच तालुक्या- तील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव निमित्त शाळांना सदिच्छा भेटी दिल्या. या भेटी दरम्यान विद्यार्थी नवागतांचे स्वागत, स्वागत दिंडी, गणवेश वाटप, शूज व सॉक्स वाटप, पाठ्यपुस्तके वाटप, गोड पदार्थांचे वाटप, शाळा मेळावा, शै० साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे उरण तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

