रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / रोहा : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवार पार पडली… यामध्ये रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार मधुकर मारुती पाटील यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच रोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मधुकर पाटील यांच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला…
मधुकर पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करत संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे… पक्षाच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत… त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी सातत्याने पक्षासाठी आणि जनतेसाठी काम केले आहे…
रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा मधुकर पाटील यांच्यासह कुटुंबीय भावूक झाल्याचे दिसून आले…
या निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी सभापती अनिल भगत, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी मधुकर पाटील यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या…
दरम्यान, रोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला… मधुकर पाटील यांच्या निवडीमुळे रोहा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे..-संघर्षाच्या काळात तटकरेंशी साथ न सोडलेला नेता-
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या संघर्षाच्या काळात रोहा माणगाव तालुक्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळी त्यांच्या पासून दूर गेलेली, परंतु मधुकर पाटील हे एकमेव वरिष्ठ नेते त्यावेळी तटकरेंच्या सोबत राहिले, त्यांनी तटकरेंची साथ सोडली नाही, तटकरे कुटुंबीयांसोबत कायम प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिलेले मधुकर पाटिल हे पक्षामध्येही जिल्ह्यात ज्येष्ठ असल्याने तटकरेंनी त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे..
