🔴 रायगड लोकधारा वृत्त :
दिनांक : ९ नोव्हेंबर २०२५
रायगड लोकधारा प्रतिनिधी : “मी आज जगभर फिरतो; परंतु आजपर्यंत ४५० कार्यकर्त्यांनाही विमान प्रवास घडवला आहे. एकेकाळी रामशेठ ठाकूर, जयंत पाटील यांच्या माध्यमातून परदेश प्रवासाला सुरुवात केली होती, पण त्यांची कार्यकर्त्यांना परदेशात नेण्याची परंपरा आणि वारसा आजही मीच जपतोय, हे अभिमानाने सांगेन. मी कार्यकर्त्याला कुटुंबाचा घटक मानतो, म्हणून त्याचे सुख-दुःखही आपले मानतो.
त्यामुळेच आयुष्यात प्रामाणिकपणे साथ दिलेला प्रत्येक जण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना घरबांधणीसाठी मदत, फ्लॅट, बंगले दिले. एवढेच नाही तर माझा कार्यकर्ता ऐटीत चारचाकीत फिरला पाहिजे, म्हणून अनेकांना फोरव्हीलर (चारचाकी) दिल्यात. त्याचाच भाग म्हणून चिरनेर येथील राजेंद्र जगन्नाथ भगत यांना शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर टाटाची नेक्सॉन भेट म्हणून दिली.
माझा कार्यकर्ता, सहकारी आनंदी तर मी अत्यानंदी, ही माझी कायम भूमिका राहील,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी चिरनेर येथे राजेंद्र भगत यांना चारचाकी दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले, “आयुष्य जगत असताना मी सतत सकारात्मक विचार केला. माझ्यावर अनेक बरेवाईट प्रसंग आले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर आर्थिक डोलारा पार कोसळला, पण अशावेळी खरी साथ लाभली ती सौभाग्यवती शुभांगीताईंची. ‘माझे सर्व सौभाग्य लेणे (दागिने) विका, पण ताण घेऊ नका’, असे म्हणणाऱ्या त्या एकमेव होत्या. त्यावेळी मी परिस्थितीनुरूप सौभाग्यवतींचे सर्व दागिने विकले; परंतु मनाशी दृढनिश्चय केला आणि पुन्हा जोमाने कामाला लागलो. मेहनतीशी तडजोड केली नाही, पडेल ते काम केले, आयुष्यातील प्रत्येक क्षण वेगळा अनुभव देत गेला. त्यातूनच पुढे आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने मला सुगीचे दिवस आले. त्यामुळेच मी ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आलेला प्रत्येक गरजवंत रिकाम्या हाताने परत जाणार नाही, याची काळजी घेतो.”
यावेळी उरण विधानसभा युवक इंटक आणि चिरनेर काँग्रेस अध्यक्ष आणि चारचाकीचे लाभार्थी राजेंद्र भगत म्हणाले, “मी आमचे नेते महेंद्रशेठ घरत साहेबांना गुरुस्थानी मानतो. त्यांनी मला माझ्या आजवरच्या बऱ्यावाईट प्रसंगात दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच माझे चारचाकीचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले. आज माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाल्याने आम्ही आनंदी आहोत. महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे नेते सर्वांना लाभत नाहीत, पण आम्ही परमभाग्यवान आहोत, की महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे नेते आमच्या मागे कायम खंबीरपणे उभे आहेत. आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वतः १५-१६ तास मेहनत करतात.”
संकष्टी चतुर्थी निमित्ताने चिरनेर महागणपतीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते चारचाकीचे पूजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड काँग्रेस उपाध्यक्ष मुरलीधर ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका पर्यावरण अध्यक्ष अंगद ठाकूर,काँग्रेस नेते अलंकार परदेशी, भेंडखल उपसरपंच अजित ठाकूर, उरण तालुका पर्यावरण उपाध्यक्ष नितीन नारंगीकर, सचिन घबाडी, किरण कुंभार, राजेश ठाकूर, तसेच परिवाराचे सदस्य, मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एमजी ग्रुपचे अनेक सहकारी उपस्थित होते.



