महाड -: विकासाच्या मुद्यावरच शिवसेना महाड नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरी जाणार असून, सूज्ञ महाडकर शिवसेनेच्या पदरातच विजयाचे दान टाकतील. गेल्या साडे तीन चार वर्षांच्या काळात महाड शहराच्या विकासासाठी सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा निधी आपण आणला आहे. यावेळेस महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आणि भविष्यातही महाड शहराचा सर्वांगिण विकास हेच ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवले असल्याचा विश्वास महाडचे आमदार आणि राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाड नगरपालिका निवडणूकीत शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरी जात असून, सोमवारी शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी श्री. गोगावले यांनी ही पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे सर्व उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत असे ना. गोगावले यांनी सांगितले. मात्र उमेदवारांची नावे त्यांनी यावेळेस जाहीर केली नाहीत. मात्र आमच्या उमेदवारांमध्ये काही जुन्या आणि अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.
गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाड शहरातील विविध विकासकामांसाठी साडेतिनशे कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करुन आणला आहे. त्यातून नळपाणी पुरवठा योजना’ भूमीगत वीजवाहिन्या, भूमीगत गटारे विकास आराखड्यातील अंतर्गत रस्ते, भाजी मार्केट/छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभिकरण, दादली महाड पूल, गांधारी नदीवरील पूल, अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत, काही प्रगतीपथावर आहेत तर काही कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाडचे आराध्य दैवत वीरेश्वर महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस मानवंदना देण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. चवदार तळे परिसराच्या सौदर्गीकरणासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. चवदार तळ्याच्या पात्रातील पाण्याचे अमृतसर येथील सुवर्ण मंदीराप्रमाणे शुद्धीकरण करून ते पिण्यायोग्य करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सावित्री नदीपात्रातला गाळ काढण्याचे काम आपण केले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या काळात शहरात मोठी पूरसमस्या उद्भवलेली नाही. गाळ काढण्याच्या या कामासाठी आणखी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने गाळ काढण्याचे काम करता आले नाही. मात्र, पुढील किमान पंधरा वर्ष महाडला पुराचा फटका बसणार नाही अशा पद्धतीने काम करण्याचे नियोजन आपण केले असल्याचे त्यांनी सांगितले. महाडकर मतदार सूज्ञ आहे. आपण केलेली, करणार असलेली कामे त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. दुसरीकडे विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे या वेळेस महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळेस भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर नाही अशी विचारणा केली असता, यापूर्वी झालेल्या नगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर होता. यावेळेसही नैसर्गिक मित्र असल्याने आम्ही या पक्षाबरोबर चर्चा केली होती. जागा वाढवून देण्याचीही आमची तयारी होती. मात्र ते आमच्याबरोबर का आले नाहीत याचे उत्तर तेच देवू शकतील असे ते म्हणाले.
विरोधी पक्षातील अनेक मातब्बर कार्यकर्तेशिवसेनेत प्रवेश करित आहेत. शहरात आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत महाड शहरात जे घडले त्याची पुनरावृत्ती यावेळेस होणार नाही. समिकरणे बदलली आहेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेला भरतशेठ गोगावले यांच्यासमवेत सुनिल कविस्कर, नितीन पावले, दीपक सावंत, सुनिल अगरवाल, सिध्देश पाटेकर यांच्यासह नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवारही उपस्थित होते.
पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाड शहर महिला आघाडी प्रमुख सौ. जान्हवी विचारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
