रायगड लोकधारा न्यूज :
मुंबई: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. तर, भाजपकडून ठाण्यात होत असलेल्या कुरघोडीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे गट करणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत गणेश नाईक यांनी शत प्रतिशत भाजप करण्याची तयारी दर्शवल्यानंतर शिंदे गटाने आता नाईकांना नवी मुंबईतच घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
नाईकांकडून ठाण्यात मोर्चेबांधणी, शिंदे गटाचे प्रत्युत्तर…
भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातही जनता दरबार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या होमग्राउंडवर भाजपकडून त्यांना घेरण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली होती. ठाणे महापालिका काबीज करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तर, दुसरीकडे आता शिंदे गटानेही भाजपला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते, उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या 19 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे.
रमाकांत म्हात्रे करणार शिवसेनेत प्रवेश…
काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रमाकांत म्हात्रे यांच्यासह प्रदेश युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुलगा अनिकेत म्हात्रेंना ऐरोली विधानसभेच तिकीट मिळावं यासाठी रमाकांत म्हात्रे हे आग्रही होते. परंतु पक्षाने 4 कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या नेत्यांना मॅनेज केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे रमाकांत म्हात्रे हे काँग्रेस सोडणार असल्याची शक्यता बळावली होती.
रमाकांत म्हात्रे यांनी म्हटले की, दिवंगत आनंद दिघे यांचा सहवास मला लाभलेला आहे आणि याची पूर्ण कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री उदय सामंत माझ्यासाठी सभा घेणार. ऐरोली विधानसभेतील काही प्रभागात रमाकांत म्हात्रे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच्या परिणामी काही प्रभागात म्हात्रे यांचं वर्चस्व आहे. याचा फायदा आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत करण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असणार आहे.
