रायगड लोकधारा न्यूज :
नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका १२ वर्षीय मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा मुलगा सायकलवरुन जात होता. दरम्यान रस्ता दुरुस्ती करणाऱ्या डंपरची त्याच्या सायकलला जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक पोलीस पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडी बेलापूरच्या सेक्टर ८ येथील आर्टिस्ट व्हिलेजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला. त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे रस्त्याच्या मेंटेनन्सचे काम सुरु होते. दरम्यान रस्ता दुरुस्तीचे साहित्य घेऊन एक डंपर ट्रंक येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. लहान मुलगा सायकलवरुन त्याच्या क्लासला चालला होता. तेवढ्यात महापालिकेचे सामान घेऊन येणारा डंपर ट्रकच्या रस्त्यात आला आणि डंपरने त्या मुलाच्या सायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. या मृत मुलाचे नाव शिवम भट आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. बेलापूर पोलीस देखील तेथे पोहोचले. घटनास्थळी मृत मुलाच्या पालकांना बोलवण्यात आले. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेमध्ये पाहून त्या आईने टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान बेलापूर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
