रायगड लोकधारा न्यूज :
उल्हासनगर : यावेळी पोलिसांनी 7 हजार लिटर वॉश, लोखंडी टाक्या ड्रम, इलेक्ट्रिक पंप आणि भट्टी पेटवण्यासाठी वापरण्यात येणारे फॅन असा संपूर्ण पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जागीच जेसीबी आणि गॅस कटरच्या मदतीने नष्ट केला आहे. मध्यरात्री हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या छापेमारीत गावठी हातभट्टी दारूचा मोठा अड्डा उद्ध्वस्त करण्याची सर्वात मोठी कारवाई उल्हासनगर क्राईम ब्रँचने केली आहे. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी लागणारा 8 किंबहूना वापरला जाणारा पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जेसीबी-गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला आहे.
याप्रकरणात 3 हातभट्टीच्या मालकांसह तब्बल 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून या तिन्ही मालकांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारली पाडा येथे पाटील चाळजवळ असलेल्या झाडाझुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूचे उत्पादन सुरू असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रॅंचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना मिळाली होती. तेंव्हा अॅक्शन-मोडवर आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण खोचरे, सचिन कुंभार, सुरेश जाधव, विजय जिरे, सतीश सपकाळे, शेखर भावेकर, प्रसाद तोंडलिकर, रामदास उगले आणि संजय शेरमाळे या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी 7 हजार लिटर वॉश, लोखंडी टाक्या ड्रम, इलेक्ट्रिक पंप आणि भट्टी पेटवण्यासाठी वापरण्यात येणारे फॅन असा संपूर्ण पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जागीच जेसीबी आणि गॅस कटरच्या मदतीने नष्ट केला आहे. या कारवाईत हातभट्टी मालक लहू हाल्या म्हात्रे, आदेश पंडित गायकर, संतोष लहू चोळेकर, हातभट्टी वरील कामगार बंडू भाऊसाहेब शेलार, चंद्रप्रकाश राम लखन यादव, उमेश हरिराम चौधरी, बाबुराम रामनयन प्रजापती, सुग्रीव रामायण प्रजापती अशा 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात हातभट्टीचे मालक लहू म्हात्रे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल 11, तर आदेश गायकर वर 2 आणि संतोष चोळेकर वर 7 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले.

