रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर असणारा पनवेल एक्झिट ११ फेब्रुवारीपासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. कळंबोली जंक्शनच्या कामकाजामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून एक नवा उड्डाणपूल आणि अंडरपास तयार करण्यात येत असल्यानं पनवेल एक्झिट बंद ठेवला जाणार आहे.
नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पनवेल एक्झिट बंद झाल्यानं मुंब्रा, जेएनपीटी या दिशेने जाणाऱ्या लहान वाहनांसह जड वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग दिला जाणार आहे. मोटर वाहन कायद्यांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा पनवेल एक्झिट मार्ग ६ महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पनवेल एक्झिट बंद झाल्यानं पनवेल, मुंब्रा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर प्रचंड परिणाम होणार आहे. पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा, जेएनपीटीच्या दिशेने जाणारी वाहने कोनफाटा इथल्या पळस्पे सर्कलमार्गे एनएच ४८ वर वळवण्यात येतील. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी आणि तळोजा, कल्याण, शिळ फाट्याकडे जाणारी वाहने रोडपाली आणि एनएच ४८ मार्गे जाऊ शकतील.
