रायगड लोकधारा वृत्त :
सुनील घरत, प्रतिनिधी ठाणे : वासिंद- आसनगाव मार्गावर लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती 18 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर येत आहे.
वासिंद-आसनगाव मार्गावर मृत्यू झालेल्या आकांक्षा जगताप हिने लोकलमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणामुळं तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या तपासात ही बाब निष्पन्न झाल्याचे समोर येत आहे.
आसनगाव- वासिंद दरम्यान वेहलोली फाट्याजवळ 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आसनगाव लोकलमधून एक तरुणी खाली पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर लगेचच तिला उपचारांसाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांकडून आणि मित्र-मैत्रिणींकडून चौकशी करण्यात आली. त्यात जी माहिती उघड झाली त्यानुसार आकांक्षाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या मुलासोबत तरुणीचे प्रेमप्रकरण होते त्याचा शोध लागला नसून तो डोंबिवलीतील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तसंच, तोदेखील अल्पवयीन असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून तरुणीचे त्याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या कुटुंबीयांनादेखील याबाबत माहिती होती. मात्र त्यांच्यात काय बिनसले आणि तिने इतक्या टोकाचे पाऊल का उचललं हे मात्र समोर आले नाहीये.
मयत तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसंच, कुटुंबीयांकडूनही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मुलीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये गर्दी वाढत असताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनमधून पडून एका तरुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
