रायगड लोकधारा वृत्त :
संजय गडदे, मुंबई : लीच्या आईने भेटण्यास विरोध केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरूणाने १७ वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी पूर्व येथे घडला आहे. पीडित मुलगी या घटनेमध्ये ६० टक्के भाजली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपी तरुणही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व परिसरात पीडित मुलगी आई-वडील आणि ३ भावंडासोबत राहते. मुलीचे वडील चालक तर भाऊ खासगी कंपनीत कामाला आहे. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखते. सहा महिन्यांपूर्वी शेजाऱ्याने पीडित मुलीच्या आईला ती जितूसोबत परिसरात फिरत असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर मुलीच्या आईने जितूला समज दिली आणि तिला भेटण्यास मनाई केली. रविवारी उशिरा रात्री पीडित मुलीच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला. त्याने मुलीवर कोणीतरी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीची अवस्था पाहून तिला धक्काच बसला.
पीडित मुलगी अर्धवट भाजलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसली. त्यावेळी पीडित मुलीने आपल्या आईला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ‘आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले.’, असे तिने आईला सांगितले. जखमी झालेल्या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत पीडित मुलीला तात्काळ कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमध्ये पीडित मुलगी ६० टक्के भाजली आहे. जखमी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये आरोपी जितू देखील भाजला आहे. त्याच्यावर देखील कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी जितूविरोधात एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १२४ (१) आणि १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
