रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील : भारतीय नौदल परीक्षेत ठाणेकर तरुणाची झेप नितेश साळवी देशात पहिला
भारतील नौदलाच्या परीक्षेत ठाणेकर तरुणाने घवघवीत यश संपादन केले आहे. नितेश साळवी असे या तरुणाचे नाव असून संपूर्ण देशात उत्तीर्ण झालेल्या चार जणांमध्ये तो पहिला आला आहे. अवघ्या २८ वर्षांच्या वयात प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या नितेशसाठी आता नौदलाचे दरवाजेही उघडे झाले असून ठाण्याच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चंदनवाडी परिसरात राहणाऱ्या नितेशचे वडील सुनील साळवी हे प्रशासकीय सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे नितेशला लहानपणापासूनच देशसेवेचे बाळकडू मिळाले. शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी सरकार दरवर्षी एक प्रशिक्षण आयोजित करते. यामध्ये देशभरातून केवळ दहा जणांना प्रशिक्षण दिले जाते. आधी बेसिक सिव्हिलियन कोर्स होता. त्यामध्ये या वेळी सरकारने विस्तार करीत अॅडव्हान्स ट्रेनिंग देण्याचे ठरवले. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सागरी मंडळात सहाय्यक जलालेखन सर्वेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नितेश साळवी याची निवड करण्यात आली. ज्या वेळी नितेशची निवड झाली, तेव्हा काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. या परीक्षेसाठी सुरुवातीला तोंडी परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि शेवटी लेखी परीक्षा गेल्या आठवड्यात पार पडली. याचा निकाल शनिवारी (ता. २२) जाहीर करण्यात आला. यामध्ये नितेशने प्रथम क्रमांक मिळवला. गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोग्राफी येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. साधारण दीड महिन्यासाठी प्रशिक्षण होते. या हायड्रोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी सिव्हिल इंजिनिअरींग ही शैक्षणिक अट असते. समुद्री कामाचा अनुभव लागतो. नितेश हा बीई सिव्हिल इंजिनिअर आहे, त्यामुळे त्याची यासाठी निवड करण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६० टक्के गुण आवश्यक असतात. यामध्ये १० पैकी चार जण उत्तीर्ण झाले असून नितेशने यामध्ये सर्वाधिक ७९ टक्के मिळवत देशात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. आता मुलाखत घेऊन थेट नौदलात नितेशला सेवा देण्यात येणार आहे.
मेहनतीचे फळ मिळाले !
मेरिटाइम बोर्डात सेवा देणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांसाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची असते. मुळात त्यासाठी निवड होणेच ही मोठी गोष्ट असते. आजच्या घडीला देशात ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या फक्त २५० आहे. यामध्ये आता माझाही समावेश झाला असून हा मेहनतीचे फळ मिळाले असल्याची भावना नितेशने वक्त केली.
