रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील : ठाणे जिल्ह्यातील धरणांमुळे ओळख असलेल्या शहापूर तालुक्याला सध्या पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत शहापूर तालुक्यातील १६ गावे आणि ७० वाड्यावस्त्या मिळून एकूण ८६ गावे, पाड्यांना २९ टँकरने पाणीपुरवठा येथे सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावते. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. महसूल उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्याकडून २२ गावे आणि १०८ वाड्यावस्त्या एकूण १३० गावे, पाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याला मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तहसीलदार कळमगाव, शिळ, शेलवली (बां), वेहळोली (वासिंद) ही गावे टँकरने पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे तातडीने दोन टँकर वाढविण्यात येणार असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत टंचाईग्रस्त गावे, पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या येथे २५ इतकी होणार आहे. टंचाईग्रस्त गावे, पाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन युद्धपातळीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासोबतच अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पाणीटंचाईने गावे बाधित होत असली तरी या परिस्थितीवर नियंत्रण असल्याचे पंचायत समितीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या उपअभियंता विजया पांढरे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च : जिल्ह्याला फेब्रुवारीच्या अखेरीस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची कळ सोसावी लागते. दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांसह पूरक नळ पाणीपुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित
जलजीवन मिशनअंतर्गत कामे सुरू..! : ठाणे जिल्ह्यातील भातसा, तानसा धरणांमधून ठाणे व मुंबईची तहान भागवली जाते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राज्य व केंद्र शासन पुरस्कृत योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणीटंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
साथीचे आजार वाढण्याची भीती : आघाणवाडी, वाशाळा, वेळूक, अघई, खोस्ते या वाड्यावस्त्यांमध्ये टँकरचे पाणी पुरेसे नसल्याने नैसर्गिक जलस्त्रोतांच्या हद्दीत ओळसर जमिनीत खड्डे खोदून पाणी काढले जात आहे. हे पाणी काढताना रात्रंदिवस कसरत करावी लागत आहे. शिवाय गढूळ व मातीमिश्रित पाणी असल्याने साथीचे आजार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेने टँकरची संख्या कमी पडत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे.


