रायगड लोकधारा वृत्त :
विश्वनाथ सावंत, नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका मुलाचा हिट अँड रन्स प्रकरणामध्ये मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रकने या मुलाला धडक दिली होती. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव (वय १४) असं मयत मुलाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी कार्तिक नेहमी प्रमाणे जॉगिंग करण्यासाठी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडला होता. घणसोली परिसरात जॉगिंग करत असताना त्याला एका ट्रकने जोराची धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे कार्तिक गंभीर जखमी झाला होता. जबर मार लागल्यामुळे कार्तिक जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात कार्तिक रस्त्यावर विव्हळत होता. पण त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. सुमारे १०-१५ मिनिटं तो तिथेच पडून होता. यावेळी अनिकेत नावाचा तरुण तिथे आला. त्याने कार्तिकला पाहिलं आणि तात्काळ त्याला रिक्षात टाकून वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयात लगेच दाखल केलं. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कार्तिकच्या अपघाताबद्दलची माहिती देण्यात आली. कार्तिकला गंभीर दुखापत झाल्यानं त्याची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे वाशीमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सायन येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्याचावर गेली २ दिवस सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावलली आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये कार्तिकच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस फरार वाहन चालकाचा शोध घेत आहे.
