रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी : भाजपचे आमदार निलेश राणे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या वनविभागाच्या कारभारावर समाजमाध्यमांवरून अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘राज्यात वनेच शिल्लक राहिली नाहीत, तर वनमंत्री पदाचा उपयोग काय?’ असा अत्यंत खोचक सवाल उपस्थित करत राणे यांनी वनखात्याच्या ढिसाळ नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. गणेश नाईक हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि टीआरपी मिळवण्यासाठी धडपडत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
वनविभागाच्या कामाची लक्तरे वेशीवर टांगताना निलेश राणे यांनी अनेक गंभीर मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात की, सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर बेसुमार जंगलतोड सुरू आहे, ज्याचा थेट फटका ग्रामीण भागातील जनतेला आणि विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. जंगलांचे आच्छादन नष्ट होत असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. या प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत असून, अनेक शेतकऱ्यांनी हतबल होऊन आपली शेती कसणे सोडून दिले आहे. तरीही वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासारख्या मूलभूत विषयांकडे वनमंत्र्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
वनविभागातील साधनसामुग्री आणि मनुष्यबळाच्या कमतरतेवरही त्यांनी बोट ठेवले आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरच उपलब्ध नाहीत, तसेच विभागाकडे पायाभूत सुविधांसाठी आणि आवश्यक उपकरणांसाठी पुरेसा निधीही नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय, काही ठिकाणी नियुक्त केलेले विभागीय वन अधिकारी (DFO) हे परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, ज्यामुळे समस्या सुटण्याऐवजी त्या तशाच प्रलंबित राहत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईतील डोंगर पोखरले गेल्याच्या जुन्या प्रकरणाचा संदर्भ देत, आता जंगलेही त्याच पद्धतीने पोखरली जात आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड ही वनमंत्र्यांच्या संमतीनेच सुरू आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, विकासाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना वनविभागाकडून परवानग्या नाकारल्या जात आहेत, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहत आहे.
अलीकडच्या काळात वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना तुरुंगात जाण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू सावरून धरत गणेश नाईक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.
