रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी :- महाड तालुका रिक्षा युनियन अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धा रविवार, दि. २७ एप्रिल रोजी शहरातील क्रांतिस्तंभ मैदान येथे पार पडल्या असून या स्पर्धेचे उदघाटन युनियनचे अध्यक्ष रोहित रवींद्र पाटील आणि युनियनचे हितचिंतक सिद्धेश पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रिक्षा युनियन अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत महाड एस. टी. स्टॅण्ड नाईट रिक्षा स्टॉप संघ, दस्तुरी नाका रिक्षा स्टॉप संघ ए व बी, विरेश्वर मंदिर रिक्षा स्टॉप संघ, जुना पोस्ट नाका रिक्षा संघ ए व बी, भाजी मंडई रिक्षा स्टॉप संघ, शिरवली महाडिक कोंड रिक्षा स्टॉप संघ, रायगड नातेखिंड रिक्षा स्टॉप संघ, वेलकम रिक्षा स्टॉप संघ, श्रीराम मंदिर रिक्षा स्टॉप संघ, आणि नवेनगर रिक्षा स्टॉप संघ अशा बारा संघानी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जूना पोस्ट नाका रिक्षा स्टॉप ए संघाने रायगड नातेखिंड रिक्षा स्टॉप संघाला अटीतटीच्या सामन्यात एका धावेने पराभूत करत तिसऱ्या महाड तालुका रिक्षा युनियन चषकावर आपले नाव कोरले.
यावेळी रायगड नातेखिंड रिक्षा संघ हा उप विजेता ठरला, तर तृतीय पारितोषिक वेलकम रिक्षा स्टॉप संघाने पटकाविले. या स्पर्धेत बेस्ट बॉलर हरीश महाडिक तर बेस्ट बॅटर बंटी जाधव यांची निवड झाली.
या स्पर्धेला राज स्पेअर पार्ट्सचे धारिया, रिक्षा मेकॅनिक अभि गुढेकर, ॲड. मंगेश हुमणे , ॲड. विशाल गोलांबाडे, रिक्षा युनियन माजी अध्यक्ष लक्ष्मण भुवड तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अजित सोनावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्पर्धा प्रमुख मुकेश शिंदे, मिलिंद निंबरे, सजित पाटील, संजोग म्हशीलकर, नारायण जगताप, शंकर कदम, महेश मेहता, प्रभाकर खांबे आदी स्पर्धा कमिटीने विशेष मेहनत घेतली.
