रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकांचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘भाजपा सांस्कृतिक महोत्सव’ गुरुवार दिनांक १ मे पासून चार दिवस खारघर मधील सेक्टर १२ येथील गावदेवी मैदानावर रंगणार असून या महोत्सवाचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम पहायला मिळणार आहे.
खारघर भाजप आयोजित या महोत्सवात गुरुवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ९० कलाकारांच्या संचासह ‘महाराष्ट्राची महासंस्कृती’ कार्यक्रम होईल. यात आपल्या राज्याच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य सादरीकरण होणार आहे. शुक्रवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी ६ वाजता खारघर आणि पनवेल परिसरातील विविध संस्थांचा सांस्कृतिक कलाविष्कार, शनिवार ३ मे सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांची मैफिल तर रविवार दिनांक ०४ मे रोजी ग्रुप डांस स्पर्धा होणार आहे. या महोत्सवात चारही दिवस सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कोल्हापूर, सातारा, वऱ्हाडी, नाशिक, मुंबई, पुणेरी चविष्ट मिसळचे स्टॉल्स असणारा मिसळ महोत्सव तसेच इतिहास प्रेमींसाठी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शनही असणार आहे.
