रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : क्रियाशील प्रेस क्लब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ( दि. १७) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी झालेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये कोकण डायरी वृत्तसमूहाचे संपादक तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी साबीर शेख यांची निवड करण्यात आली. यामध्ये खजिनदारपदी चंद्रकांत शिर्के तर कार्याध्यक्षपदी राज भंडारी यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून संतोष वाव्हळ, प्रदीप ठाकरे आणि अनिल राय यांची तर सदस्यपदी विशाल सावंत, भूषण साळुंखे यांची निवड करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण करून पत्रकारितेतील विविध संघटनांच्या माध्यमातून काम करीत असताना राजकारणात देखील एक यशस्वी प्रवास सय्यद अकबर यांनी पार केला. समाज हिताचे कार्य त्यांनी केले आहे. आता क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा त्यांच्या हाती आल्यामुळे परिसरातील नागरिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देवून तसेच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तालुक्यातील आदिवासी वाड्या, वृद्धाश्रम आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असा विश्वासही यावेळी संघटनेचे अध्यक्ष सय्यद अकबर यांनी व्यक्त केला.
