🔴 रायगड लोकधारा वृत्त :
वार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात….
महाड प्रतिनिधी : गावाच्या विकासासाठी केवळ पैसाच महत्वाचा नसून भेदभाव सोडून एकजुटीने, स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन प्रयत्न केले, तर आदर्श गाव निर्माण होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण चिंभावे हळदवणेवाडी या गावात प्रकर्षाने जाणवले असे विभग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांनी प्रतिपादन केले.
चिंभावे हळदवणेवाडी गावाची वार्षिक श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे औचित्य साधून छोटेखाणी सत्कार सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पं.समितीचे माजी सभापती सदानंद मांडवकर, चिंभावे सरपंच विक्रम मालप, सदस्य नितीन कदम, कुणबी समाजोन्नती मंडळ महाड-पोलादपूर शाखेचे सहसचिव समीर रेवाळे, कृषी उत्पन्न समितीचे चेअरमन संदेश गोठल, सुनील जाधव, सेवानिवृत्त अन्नदाते रघुनाथ पां.भागवत, डॉ. विनायक डवरे, डॉ. सुभाष माने, ज्ञानेश्वर गजमल, कुणबी समाज ओळेगट अध्यक्ष प्रकाश देवळे, माजी अध्यक्ष अनंत शिंदे, राजेंद्र भुवड, जुई माजी सरपंच जावेद दुस्ते यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
ग्रामस्थांची एकजुट म्हणजे गावातील लोक एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांनी गावाच्या विकासासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी काम करतात. हे सहभागातून, वर्गणी जमा करून आणि श्रमदान करून शक्य होते, ज्यायोगे गावात विविध सोयी-सुविधा उभ्या केल्या जातात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन किंवा इतर सामाजिक कार्यांमध्ये यश मिळते. गावासाठी जे-जे माझ्याकडून सहकार्य लागेल ते मी करायला कटिबद्ध असल्याचे जाबडे यांनी सांगितले. मांडवकर यांनी गावाच्या एकीचे विशेष कौतुक केले. पत्रकार भागवत यांच्या माध्यमातून खाडीपट्टयाचा बुलंद आवाज म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे त्यांची पत्रकारिता पाहत आहोत असेही ते म्हणाले.
यावेळी दै. पुढारी पत्रकार रघुनाथ भागवत यांना नुकताच जाहीर झालेला कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे मान्यवरांच्या हस्ते गावाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत मालप यांनी सुंदरप्रकारे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई मंडळाचे संदीप मालप, अजित देवळे, योगेश मालप, मुंबई पोलीस प्रमोद ठोंबरे, माजी सैनिक जितेंद्र शिकवण, रवींद्र भारसिंग, प्रकाश देवळे, सतीश भारसिंग, शैलेश आंबेकर, अमोल ठोंबरे, दत्ताराम आंबेकर आदी तसेच ग्रामस्थ मंडळाचे विजय साळी, सिताराम भारसिंग, दगडू ठोंबरे, नारायण चव्हाण, विक्रांत घाणेकर आणि सर्व ग्रामस्थ, महिला मंडळाने मेहनत घेतली. यावेळी चिंभावे सुतारकोंड येथील हरिपाठ, सुस्वर भजनाने सर्वत्र मंगलमय वातावरण पसरले होते.
