🔴 रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. ६ / विठ्ठल ममताबादे : “फोर्टीप्लस, फिफ्टी प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा. वयाचाही विचार करा, जमेल तेवढेच धावा, कारण जर का या वयात दुखापत झाली तर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल. तब्येत महत्त्वाची, त्यामुळे ऊर फुटेस्तोवर धावू नका,” असा जिवाभावाचा सल्ला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल तालुक्यातील वहाळ येथे क्रिकेट खेळाडूंना दिला.
ते पुढे म्हणाले, “मी ना आमदार ना खासदार, पण अनेक गावांना सिडकोकडून मैदाने मिळवून दिलीत. त्यामुळे दोन आमदार नेमके करतात काय? पुढच्या पिढीचा विचार करून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या गावांना त्यांनी किमान मैदाने तरी मिळवून द्यावीत.”
फोर्टीप्लस मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेवेळी शनिवारी (ता. 6) महेंद्रशेठ घरत बोलत होते. दिगंबर स्मृती फोर्टीप्लस मास्टर्स क्रिकेट क्लब वहाळच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. दिवंगत रमणशेठ घरत मैदान वहाळ येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शैलेश चिर्लेकर, मनोज दापोलकर, विजय घरत, मदन घरत, ज्ञानेश्वर पाटील, कपिल पाटील आणि फोर्टीप्लस वहाळ संघाने केले आहे. मनोज म्हात्रे यांनी समालोचक म्हणून भूमिका निभावली आहे.
