रायगड लोकधारा न्यूज :
अंबरनाथ प्रतिनिधी : मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची खळबळजनक घटना अंबरनाथजवळ घडली आहे. या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडले आहे. काटई अंबरनाथ राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना समोर आली.
अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाका येथून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात मार्गिकेवर उलट्या दिशेने ट्रेलर चालवत हा चालक निघाला. मार्गात समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला त्याने धडक देत ट्रेलर पुढे नेला. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकेच नव्हे, तर पोलिसांच्याही गाडीला त्याने धडक दिली. तर मार्गातीलच एका दुचाकीस्वाराला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केले.
