रायगड लोकधारा न्यूज :

डोंबिवली : एका रिक्षा चालकासह त्याच्या तीन साथीदारांनी चालकाच्या शेजारी बसण्याच्या वादातून प्रवाशासह त्याचे वडील, भाऊ आणि दोन मित्रांना बेदम मारहाण केली. त्यानंतर चालकाच्या एका साथीदारांने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ भिवंडीकडे जाणाऱ्या रिक्षा स्टँडवर घडली. याप्रकरणी रिक्षावाला आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे आपल्या कुटुंबीयांसह भिवंडी येथे राहतात. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तक्रारदार हे त्यांचे वडील, भाऊ आणि मित्रासोबत साधना हाॅटेल समोरच्या भिवंडीकडे जाणाऱ्या स्टँडवर आले. भिवंडीला जाण्यासाठी हे सर्वजण रिक्षात बसले. एका प्रवाशाला चालकाने शेजारीच्या आसनावर बसण्यास सांगितले. बसण्यावरून चालक आणि प्रवाशांत वाद झाला. या वादातून चालकाने प्रवाशाला मारहाण केली. आपल्या मुलाला का मारहाण केली? असा जाब मुलाचे वडील, त्याचा भाऊ आणि दोन मित्रांनी चालकाला विचारला. त्यानंतर रिक्षाचालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने तक्रारदार, त्यांचे वडील आणि भाऊ व मित्र यांना पकडून धक्काबुक्की सुरू केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले. चालकाच्या साथीदारांमधील एकाने चाकू काढून प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन हल्लेखोरांविरूद्धात दिलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालक व तीन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि सहकाऱ्यांना प्रवाशांवर हल्ला झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीच्या वेळेत रेल्वेस्थानक परिसरात अनेक रिक्षावाले प्रवाशांशी अरेरावी, दादागिरी, वेळप्रसंगी हल्लेही करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
