रायगड लोकधारा न्यूज :

हरियाणातील गुरुग्राम शहरात वाहतुकीसंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. आता ९० दिवसांत ट्राफीक चालान न भरल्यास गाडी जप्त होणार आहे. तसेच ज्यांचे चालान बाकी आहेत, त्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत चालान भरावे, असे निर्देशही वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी वाहतूक पोलीस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत वाहतूक पोलीस आयुक्तांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्याविरोधात कडक करवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच ज्यांचे चालान बाकी आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात बोलताना, ”गेल्या काही महिन्यांत हजारो वाहन चालकांनी त्यांचे चालान भरलेले नाहीत. अशा वाहन चालकांविरोधात आता आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जर वाहतूक नियम तोडले तर ९० दिवासांत चालान भरणं बंधनकारक राहणार आहे. जर वाहन चालकांनी ९० दिवसांत दंडाची रक्कम भरली नाही, तर अशा वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाईल”, अशी माहिती वाहतूक पोलीस आयुक्त विरेंद्र विज यांनी दिली. पुढे बोलताना, “ज्यांचे आजपर्यंतचे चालान बाकी आहेत, त्यांना आम्ही १० फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत दंडाची रक्कम भरणं आवश्यक आहे. त्यानंतर कुणाचे चालान बाकी राहल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १६७ (८) अंतर्गत कारवाई केली जाईल. या कलमानुसार त्यांची जप्त केली जातील”, असं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राम शहर वाहतूक पोलिसांकडून दररोज ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन हजार चालान जारी केले जातात. मात्र, अनेक जण हा दंड भरत नाहीत. मात्र, आता अशा वाहनचालविरोधात कारवाई केली जाणार आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
