रायगड लोकधारा न्यूज :
नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपी विधिसंघर्ष बालक असून, त्याच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील रबाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीसोबत वर्ग मित्रानेच शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन पीडिता आणि विधिसंघर्ष बालक शाळेत एकाच वर्गात इयत्ता दहावीमध्ये शिकत होते. यादरम्यान विधीसंघर्ष बालकाने पीडितेशी जवळीक साधत प्रेमसंबंध निर्माण केले. विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमधील प्रेमसंबंध फुलू लागल्यानंतर विधीसंघर्ष बालकाने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिची संमती मिळवत आपल्या दुसऱ्या घरी बोलावले. पीडिता दुसऱ्या घरी आल्यावर विधिसंघर्ष बालकाने पीडितेसोबत जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ असे सहा महिने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेचे वाढलेले पोट पाहून आईला संशय आल्याने तिने पीडितेला उपचारासाठी ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात नेले असता पीडित मुलगी ही २१ आठवडे म्हणजेच तब्बल ५ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली असता रबाळे पोलीसांनी विधीसंघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल केला असून रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असून मुलांकडे योग्य लक्ष देणे महत्त्वाची बाब असल्याचे समोर आले आहे.
