रायगड लोकधारा वृत्त :
कल्याण प्रतिनिधी : कल्याण-डोबिंवलीमधील ६५ अनधिकृत इमारतींचे प्रकरण समोर आल्यानंतर आता नवी मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडवर आले आहे. महानगरपालिका आता नवी मुंबईतील ६ हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार आहे. अनधिकृत बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार तोडक कारवाई होणार आहे. नवी मुंबईत २०१५ नंतर साधारण ६ हजार अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण उपायुक्त भागवत डोईफोडे म्हणाले, उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामांविरोधात प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यानुसार न्यायालयाने कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार नवी मुंबईतील बांधकाम झालेल्या आणि नव्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणी उचित कारवाई सुरू आहे. अनधिकृत बांधकाम पाडत असताना पोलीसांचा फौजफाट सोबत घेतला जात आहे. 80 पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आलेत. ज्या भागात कारवाई केली जाणार आहे, त्या भागातील स्थानिक पोलीस कर्मचारी देखील आम्हाला मदत करतात. तसेच गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती डोईफोडे यांनी दिलीय.
याआधी कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील ६५ इमारती अनधिकृत असल्याचं समोर आलं होतं. त्या इमारतींवर कारवाई केली गेली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६५ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली. महापालिकेने यापैकी काही इमारती तोडल्या आहेत. तर अजून ४८ इमारती तोडणे बाकी आहे. या ४८ इमारती ३ महिन्याच्या आत तोडायच्या होत्या. मात्र काही इमारतधारक कोर्टात गेल्याने इमारती तोडता आल्या नाहीत. मात्र आता कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने या ४८ इमारतींवर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
