रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई : अलीकडेच पुण्यातील स्वारगेट आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. याप्रकरणी राज्यभर तीव्र पडसाद उमटले. ही घटना ताजी असताना आता सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. इथं एका 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला एकटं पाहून तिला एका खोलीवर घेऊन जात भयंकर कृत्य केलं आहे.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वर फिरत होती. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पीडितेकडं विचारपूस केली यावेळी हा सगळा धक्कादायक घटनाक्रम उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पीडित मुलगी दादर रेल्वे स्टेशनवर भेदरलेल्या अवस्थेत आढळली
मिळालेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी एका 12 वर्षांची मुलगी दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वर भेदरलेल्या अवस्थेत फिरत होती. यावेळी रेल्वे पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली आणि तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी पीडितेकडं चौकशी केली. त्यावेळी 12 वर्षांच्या मुलीनं सांगितेली आपबिती ऐकून पोलीसही हैराण झाले.
नेमकं काय घडल?
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी एका आरोपीनं पीडित मुलीला जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या संजयनगर परिसरातील एका खोलीत घेऊन गेला होता. याठिकाणी मुख्य आरोपीसह इतर चार नराधम होते. पीडित मुलगी खोलीत गेल्यानंतर या पाचही नराधमांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. सामूहिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला दादर रेल्वे स्थानक परिसरात सोडून पळ काढला. पण रेल्वे पोलिसांना संशय आल्याने हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पाचही आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी एसी मेकॅनिक आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
