रायगड लोकधारा वृत्त :
कर्जत प्रतिनिधी : कर्जत रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने घेतलेल्या वडापावमध्ये चक्क साबणाचा तुकडा आढळला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मंगळवारी, १ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास खोपोली येथील रशिदा घोरी या महिला प्रवाशाने कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ वर असलेल्या बी. के. जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलमधून वडापाव घेतला. पहिला घास घेताच त्यांना त्यामध्ये काहीतरी अज्ञात घटक असल्याचा संशय आला. अधिक तपासणी केल्यावर त्यांना वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याने त्यांना धक्काच बसला.
या प्रकारानंतर संबंधित महिला प्रवाशाने त्वरित रेल्वे स्थानकावरील सुरक्षारक्षकाकडे तक्रार केली. मात्र, सुरक्षारक्षकाने तक्रारीकडे दुर्लक्ष करत “उद्या पहाटे ४:३० वाजता पाहू”, असे बेजबाबदार उत्तर दिले. त्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला. अखेर, महिला प्रवाशाने स्टेशन मास्तर कार्यालयात लेखी तक्रार नोंदवली.दरम्यान रेल्वे स्थानकात पदार्थ बनवण्यास मनाई असल्याने बाहेरून पदार्थ बनऊन आणले जात आहेत. मात्र त्या ठिकाणी कशा प्रकारची स्वच्छता राखली जाते. याबाबत प्रशासनाला काहीच कल्पना नसल्याने असले प्रकार समोर येत असल्याचे बोलले जात आहे.
घटनेची गंभीर दखल घेत २ एप्रिल रोजी कर्जत रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी सदर स्टॉल तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, या घटनेची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या स्टॉल चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
याबाबत त्वरित दखल घेऊन संबंधित स्टॉल स्टॉल तात्पुरता बंद केला आहे. वरिष्ठांकडे याबाबत सविस्तर माहिती पाठवली असून वरिष्ठ कार्यालयातून पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे. अशी माहिती स्टेशन प्रबंधक, प्रभास कुमार लाल यांनी दिली.
