रायगड लोकधारा वृत्त : अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी :
पुण्यात संतापजनक घटना घडली आहे. २७ वर्षीय परदेशी महिलेवर ७ जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. २०२० पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर ७ जणांनी लैंगिक अत्याचार केला. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी २ तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनु कुकडे यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून २०२० मध्ये ती भारतात असलेल्या बोध गया येथे आली होती. त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शांतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे याने पीडित महिलेची त्याच्या आणखी काही मित्रांसोबत ओळख करून दिली. पार्टीच्या निमित्ताने कुकडे आणि त्याचे काही मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जात असे. यातील एक आरोपी हा डी जे असून दुसरा आरोपी पेशाने वकील आहे. आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवर लोणावळा, रायगड आणि पानशेत याठिकाणी पार्टीच्या नावाखाली पीडित महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
