रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर आणि अजित पवार यांच्या आठवणींवर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझ्या आणि अजितदादांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, हे केवळ आम्हा बहीण-भावालाच ठाऊक आहे. दुर्दैवाने आता माझा भाऊच या जगात राहिला नाही, तर मग आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात आणि कोण खरे, कोण खोटे यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा किंवा उणीधुणी काढण्यापेक्षा जनतेच्या कामाला लागणे, लोकांचे प्रश्न सोडवणे आणि अविरत समाजसेवा करणे हीच माझ्या दादाला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.”
अजित पवार यांच्या अकस्मात निधनाचे दुःख आमच्या मनातून कधीही जाणार नाही, असे सांगताना त्या म्हणाल्या की, दादा हा अत्यंत मोकळ्या मनाचा माणूस होता. त्यांचे नसणे हे आमच्यासाठी आयुष्यभराचे शल्य आहे. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अडथळा ठरत आहेत का, या प्रश्नावर मात्र सुळे यांनी हात जोडत “राम कृष्ण हरी” असा जप करत थेट उत्तर देणे टाळले.
आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूबाबत उपस्थित केलेल्या शंका आणि घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, “रोहित हा दादांचा पुतण्या आहे. आपल्या लाडक्या काकाच्या अचानक जाण्याने त्याची अस्वस्थता होणे अगदी स्वाभाविक आहे. तो या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे. सत्य बाहेर यावे यासाठी त्याची ही धडपड सुरू आहे. आम्हाला देखील दादांचा हा अपघात नसून घातपात असावा, अशी दाट शक्यता वाटते. म्हणूनच आम्ही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहोत. हा विषय राजकारणाचा नाही, तर आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे, ज्याचे अंत्यदर्शनही आम्हाला घेता आले नाही. त्यामुळे सत्य समोर येणे गरजेचे आहे.”
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे घडलेल्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली असून, पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि परिसरात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात सध्या हिंसेचे प्रमाण वाढत चालले आहे, हे अत्यंत चिंताजनक असून, सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुप्रिया सुळे यांनी मांडलेले इतर महत्त्वाचे मुद्दे :
शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून पुढील ८ ते १० दिवसांत अंतिम निर्णय घेतील.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर संसदेत चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाचे आभार मानले.
पुण्यातील रिंग रोडचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ इतरत्र हलवू नये, उलट कलाकारांसाठी अधिक प्रशस्त आणि मोठी जागा उपलब्ध करून द्यावी.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
