रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल दि. ४ विजय चंद्रकांत गायकर : शेतकरी कामगार पक्षाचे नेते जे. एम. म्हात्रे यांनी दि. ४ मे रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ‘‘मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून, मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत आहे.’’ असे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवरच खापर फोडले.
काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये जाताना माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी खारघर टोलनाक्याचा मुद्दा पुढे केला होता. त्याचप्रमाणे शेकाप सोडताना कोणतेही कारण समोर दिसत नसल्याने जे. एम. म्हात्रे महाविकास आघाडीवर खापर फोडत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
खरं तर जाणाऱ्याला कारण हवा असतो. तो कारण म्हात्रे पिता-पुत्रांना सापडलाय. विधानसभा निवडणूका होऊन आता पाच महिने व्हायला आले. तेव्हा, महाविकास आघाडीविरोधात शांत असलेले म्हात्रे आताच एवढे आक्रमक कशापायी झाले ? असा प्रश्न आहे. कधीही पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका न मांडणारे म्हात्रे आताच एवढे हातघाईवर का आलेत, याची जाणीव शेकाप कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील प्रत्येक जाणकाराला असेलच.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघातून माघार आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी हट्ट करणाऱ्या प्रितम म्हात्रे यांच्यामुळे उरण आणि पनवेलची जागा भाजपला जिंकता आली. इथे महाविकास आघाडी एकजुटीने लढली असती तर उरण आणि पनवेलचे चित्र वेगळे असते. शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पक्षामध्ये कार्यरत नसल्याने एकटे बाळाराम पाटील हे पनवेल – उरणमध्ये पक्षाची खिंड लढवत आहेत. त्यातच, म्हात्रे यांनी बंडाचे सूतोवाच देत तशी पाऊलेही टाकली आहेत. त्यामुळे शेकापमध्ये येत्या काळात मोठी उलथापालथ होताना दिसू शकते.
ज्या पक्षामुळे आपण एवढे मोठे झालो, अशा आपल्या मातृपक्षाला अशा राजकीय परिस्थितीत म्हात्रे सोडून गेल्यास, पक्ष फोडल्यास, जे. एम. म्हात्रे – प्रितम म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात रामशेठ ठाकूर – प्रशांत ठाकूर यांच्यापेक्षाही ‘मोठे राजकीय व्हिलन’ ठरतील, असे वाटते.
