Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
२ डिसेंबर रोजी महाड नगरपालिकेची निवडणूक होत आहे. ३ डिसेंबर रोजी महाड नगरपालिकेवर सत्ता कुणाची याचे चित्र स्पष्ट झालेले असेल. यावेळेस नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या राज्यातील महायुतीमध्ये सहभागी असलेल्या दोन घटक पक्षांमध्येच लढत रंगणार असून, ही लढत अत्यंत निकराची होईल असे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.
रायगड लोकधारा विशेष प्रतिनिधी : महाड विधानसभा मतदार संघ हा कायम काँग्रेस विरोधी पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. दुसरीकडे मात्र महाड शहराने नगरपालिका निवडणूकीत सातत्याने काँग्रेस विचारांच्या पक्षांची साथ दिली आहे. अपवाद प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार मंत्री असतानाच्या काळातला. प्रभाकर मोरे मंत्री असताना महाड नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली होती. त्यानंतर गेल्या तीस पस्तीस वर्षात मात्र महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे स्वप्न हे शिवसेनेसाठी स्वप्नच राहिले आहे. स्व. सुधाकर तथा अण्णासाहेब सावंत यांचा महाड शहरावर प्रभाव होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना कधीही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही. आघाडीच्या माध्यमातून वेगळे चिन्ह घेवून नगरपालिका निवडणूक लढविण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या पश्चात स्व. माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढविण्याचे तंत्र अवलंबले. दोघांनाही नगरपालिका निवडणुकीत सातत्याने यश मिळत होते. यात गंमत अशी की, नगरपालिका निवडणुकीत त्यांना यश मिळत असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र महाड शहरातून या दोन्ही नेत्यांना कधी मताधिक्य मिळाले नव्हते. यावेळेस, प्रथमच भरतशेठ गोगावले यांना विधानसभा निवडणुकीत महाड शहरात पिछेहाट सहन करावी लागली. मात्र निवडून आल्यानंतर त्यांचा राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला असल्याने प्रभाकर मोरे यांच्या काळात महाड शहरात शिवसेनेची जशी सत्ता आली होती तसा योगायोग पुन्हा जुळून येतो का, हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. मंत्रीपदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी महाड नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आणणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाड शहरात राष्ट्रवादी – काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे प्रमुख राजकीय पक्ष कार्यरत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे भारतीय जनता पक्षाबरोबर महायुती म्हणून राज्यातील सत्तेत एकत्र आहेत. पण रायगड जिल्ह्यात या दोन पक्षांमधून विस्तव देखील जात नाही. महाडमध्ये तर या दोन पक्षांमध्ये साप मुंगसाचे वैर आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत हे दोन पक्ष कमालीचे आक्रमक असतील यात शंका नाही. या वेळेस नगराध्यक्ष थेट मतदारांमधून निवडून देण्यात येणार आहे. युती आघाडीबाबत संभ्रम कायम आहे. शहरातील सर्व सक्रीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडून सुनिल कविस्कर, नितीन पावले, पप्पू माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुदेश कलमकर, डॉ. राहूल वारंगे, काँग्रेस पक्षाकडून प्रदीप शेठ, शिवसेना ठाकरे गटाकडून बंटी पोटफोडे, मंगेश देवरुखकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पराग वडके यांची नावे चर्चेत आहेत. काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. त्यामुळे युती आघाडी न झाल्यास नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत रंगू शकते. नगरसेवकपदाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आणि मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. शहरात सत्ता काळात राष्ट्रवादी काँग्रेसने तर प्रशासकीय राजवटीच्या काळात शिवसेनेच्या आणि भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची विकासकामे झाली आहेत. त्यामुळे महाडकर मतदार कोणता झेंडा घेवू हाती या संभ्रमात सापडल्याचे दिसते.
