🔴 रायगड लोकधारा वृत्त :
कैलासराजे घरत / नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारी गाजला आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांनी आज (दि. ४ डिसेंबर २०२५) लोकसभेत आक्रमक पवित्रा घेत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तातडीने ‘लोकनेते दि.बा.पाटील’ यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. राज्य सरकारने मंजूर केलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या लाल फितीत अडकून पडला असून, त्यावर त्वरित मोहोर उमटवावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना, खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी नवी मुंबई आणि रायगडमधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनांना वाचा फोडली. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, “नवी मुंबई हे शहर उभे राहण्यामागे येथील आगरी-कोळी आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे. या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम स्वर्गीय दि.बा.पाटील यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या सन्मानार्थ विमानतळाला त्यांचे नाव देणे, ही केवळ मागणी नसून हा भूमिपुत्रांचा हक्क आहे.”

येत्या काही दिवसांत नवी मुंबई विमानतळ प्रवासासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिला की, “विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी अधिकृत नामकरणाची घोषणा झालीच पाहिजे. जर स्थानिक शेतकऱ्यांच्या नेत्याचा सन्मान झाला नाही, तर जनतेचा उद्रेक होईल अन भूमिपुत्रांचा संघर्ष सरकारला दिसेल”
