रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उलवे नोड येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाण यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवानिमित्त सकाळी ८.३० वाजता गव्हाण येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. वाद्यगजर, भगवे ध्वज आणि शिवरायांच्या जयघोषात ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे. सकाळी ९.३० वाजता उलवे नोडमधील खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील रामशेठ ठाकूर मैदान येथे मुख्य जयंती सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जयंती सोहळ्यानिमित्त त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता रामशेठ ठाकूर मैदान येथे ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहिरा ऋतुजा माने यांचा ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा विशेष शाहिरी कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून शिवचरित्र, महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि संस्कृती यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समिती तसेच गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उलवे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे व उलवेनोड येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष अशोक कडू, जयवंत देशमुख, खजिनदार गजानन घरत यांनी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती सोहळा उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
