रायगड लोकधारा न्यूज : 12 फेब्रुवारी 2025
कोन फाट्यावरील क्रेझी बॉईज बारसमोर एसटी बस पलटली ! बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर; चालकासह ४ जण जखमी
पनवेल -( प्रतिनिधी ):- पनवेल महामार्गावर कोन फाट्यावर असलेल्या क्रेझी बॉईज बारसमोर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये वाशिवली ते पनवेल जाणारी एसटी बस क्रमांक MH २० BL ३३३४ ही बस झाडाला भरधाव वेगात धडकली. बघणार्याला धडकी भरावी असेच या अपघाताचे दृश्य होते. झाडाला जोरात धडकल्यानंतर एसटी बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या भीषण दुर्घटनेत बस ड्रॉयव्हरसह ३ ते ४ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. बाकी प्रवासी सुखरूप असल्याचे वृत्त आहे मात्र या भीषण अपघाताने एसटी बसमधील प्रवासी चांगलेच भांबावले होते. घटनास्थळी पनवेल तालुका पोलीस आणि नवीन पनवेल ट्राफिक पोलीस पोचले असून जखमींना मदतकार्य आणि वाहतुकीचे नियोजन सुरु आहे. ही बस भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. कोन गावातील या रस्त्यावर अनेक दुकाने आणि टपऱ्या आहेत. त्यामुळे झाडाला धडकून बस तिथेच पलटी झाली आणि सुदैवाने आसपासची दुकाने आणि टपऱ्या यामुळे बचावल्या. हायड्र च्या मदतीने एसटीबस रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली आहे. सध्या प्रवाशांना धीर देण्याचे काम सुरु असून त्यांना उचित स्थळी पोचण्याची व्यवस्था पोलिस करत आहेत.
