रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारजमीन विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्यामार्फत आपल्या मतदारसंघात लवकरच जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना युवासेना कोअरकमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात केली. आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात या जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून तालुका आणि नगरपालिका नगरपरिषद असे वेगवेगळे जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचे सांगितले .
मतदार संघात दहा दिवसांनी जनता दरबारचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले जाईल असे सांगितले. जनता दरबारात प्रत्येक खात्याचे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील अशी माहिती देखील दिली . आपल्या लंबोदर या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण चाळके, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर, जिल्हा समन्वयक विजय आप्पा सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलिमाताई घोसाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद यांच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. पक्ष वाढीसाठी आपापसातले मतभेद बाजूला सारून विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याच्या सूचना देखील युवा सेना कोअरकमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी दिल्या. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची उचल बांगडी केली जाईल असा इशारा देखील . विकास गोगावले यांनी या पदाधिकारी मेळाव्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे .
