रायगड लोकधारा वृत्त :
अविनाश जाधव वार्ताहर – कळंबोली : नवी मुंबई महापालिकेने येत्या चार महिन्यांत अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्राचे सर्वेक्षण करून किती बेकायदा बांधकामे आहेत, हे निश्चित करा. यावर मालकांचे म्हणणे ऐकल्यानंतर योग्य ती कारवाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला गुरुवारी दिले. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत बेकायदा बांधकामांची संख्या खूप वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका किशोर शेट्टी यांनी दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या २०१८ मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल राजीव मिश्रा यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.
सध्या सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी करा आणि अस्तित्वात असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करूनही महापालिकेने कोणतीही ठोस पावले उचलली नाही, असा दावा शेट्टी यांनी केला आहे.
