रायगड लोकधारा वृत्त :
अलिबाग प्रतिनिधी : प्रेम प्रकरणातील वादातून एका युवकाने आपल्या प्रेयसीची क्रूर हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १३) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांचे राजेश पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होम येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, शेखर संतोष दुधाणे (वय 26, रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याने परळी येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करणाऱ्या पोर्णिमा अनंता देसाई (वय 22, रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिच्यावर कोयत्याने मनगटावर व गळ्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने त्याच दवाखान्यातील खोलीत बेडशीटचा वापर करून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाली पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दवाखान्याबाहेर गर्दी केली होती. परिणामी, पाली-खोपोली राज्य महामार्गावरील परळी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून, प्रेमप्रकरणातून एवढा टोकाचा निर्णय घेणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
